भूषण

नमस्कार. माझे नाव भूषण कुलकर्णी. मी मुंबईत राहतो आणि मी एक नवोदित अभिनेता आहे. माझा जन्म सुद्धा मुंबई चा. जूळ्यांपैकी मी एक. आम्ही दोघे सातव्या महिन्यात जन्मलो. अत्यंत कमजोर असल्यामुळे माझा जुळा भाऊ ४ दिवसांत मरण पावला. मला कसे-बसे माझ्या आई बाबांनी वाचवले. ह्यामुळे आई आणि खास करून बाबा माझ्या बाबतीत खूप 'प्रोटेक्टिव' आहेत. कारण त्यांनी स्वतःच्या हातांनी त्यांच्या चार दिवसांच्या मुलाला जमिनीत गाढले होते. खूप रडले होते तेव्हा ते. जनमानंतर लगेच मी २५ दिवस आय सी यू मध्ये होतो. अशी झाली माझी सुरुवात.

त्या नंतर सगळे नॉर्मल होत गेले. मी जेव्हा चौथी पाचवीत होतो तेव्हा मला आठवते मला माझा शाळेतले एक सर आवडायचे. अलोक त्रिपाठी त्यांचे नाव. २५ वर्षांचे असतील ते. घरी आल्यावर सुद्धा मला त्यांची आठवण यायची. पण सहाजिकच तेव्हा अजून काही समजायचे नाही. सातवी पासून मी नागपूर ला आलो. तेव्हा पासून अजून अनुभव आले. मुलांकडे बघणे आणि बघतच राहणे खूप आवडायचे. मुलींमध्ये काही रस नव्हता. तरीही सगळ्यांना एक मुलगी आवडते म्हणून मला पण एखादी आवडावी. म्हणून मी एक मुलगी निवडली होती. आणि वर्गात जाहीर सुद्धा केले होती. त्या मुलीला मी बिलकुल आवडायचो नाही. मला काय, बरेच होते. रक्षा बंधन च्या दिवशी सगळ्यांनी जबरदस्ती माझा हाथ पकडला आणि तिच्याकडून राखी बांधून घेतली. मी खिन्न झाल्याची अ‍ॅक्टिंग केली कारण मला काहीच फरक पडला नव्हता.

मी सातवीत असताना मला एक पाचवी मधला मुलगा आवडत होता. इतक्याशा वयात सुद्धा आता मला जाणवते की किती हंक मटेरियल होता तो! मी त्याला कॉमिक्स गिफ्ट केले. त्यावर म्हणाला, "थेंक यु भूषण दादा." घ्या आता काय? मुलीने आणि मुलाने, दोघांनी सुद्धा भाऊ बनवले. पण त्यात त्याची काय चूक? तो विषय तिकडेच संपला. आठवी-नववी-दहावी खूप कठीण गेले कारण हळू हळू माझा वेगळेपण मला जास्त जाणवायला लागले. मी मुलीसारखा चालतो, हे मला जाणवले. वर्गातली मुले मला चिडवायला लागली. कधी कधी आई सुद्धा रागात मला हिजडा म्हणायची. तेव्हा वाईट वाटले का आठवत नाही पण आता आठवून वाईट वाटते. मग दोन-तीन मुलांनी माझी रॅगिंग सुद्धा चालू केली. जेव्हा मन करेल तेव्हा ते मला मारायचे. खूप भीती वाटायची. पण कधीच कोणाला सांगितले नाही कारण त्याहूनही मोठे दडपण मनावर होते - मुलीसारखे वागतो ह्याचे. मला आठवते तेव्हा 'ओम नमः शिवाय' सिरीयल यायची दूरदर्शन वर. त्यामुळे खूप प्रभावीत झलो आणि वाटायचे शंकर तर भोले आहेत, लवकर माझी इच्छा पूर्ण करतील आणि मी त्यांना प्रथांना करायचो कि माझे चालणे मुलासारखे होऊ दे. मला मुली आवडू दे.

बरे झले त्यांनी माझे ऐकले नाही. नाहीतर आज मी स्ट्रेट असतो आणि होमोफोबिक सुद्धा. अरे बापरे! पण आज मी किती खुश आहे. एकदा गम्मत अशी झाली ती मुले नेहमी प्रमाणे माझी वाट बघत होते रॅगिंग करायला. मी त्यांना दुरून पाहिले पण मला वर्गात जायचे होते कसेही करून. भीती तर मला वाटत होतीच पण मार खाण्यापासून कसे वाचायचे ह्याचा मी विचार करत होतो. त्यांच्याशी लढण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. मी माझ्या आयुष्यातले सगळे वाइट प्रसंग आठवले, डोळ्यात पाणी आणले आणि त्यांच्या समोरून जाऊ लागलो. माझ्या डोळ्यात पाणी बघून त्यांनी त्यादिवशी मला मारले नाही. मी वर्गात गेलो आणि उड्या मारायला लागलो. विजयी झाल्याची फिलिंग आली होती मला. मला वाटते की तेव्हा माझ्या मध्ये हा अक्टिंग चा किडा घुसला असावा, आणि आज मी एक अभिनेता आहे. हा हा हा हा!

मग अकरावी बारावी अजुन त्रासाचे गेले. दडपण, भीती, गुनेह्गारी भावना ह्यामुळे मी अजूनच एकटा होत गेलो. कॉलेजमध्ये मी पहिल्या बाकावर एकटा बसायचो. अभ्यासाची आवड होती पण लक्ष लागायचे नाही. आई बाबांना वाटायचे की मी अभ्यासाबाबत सिरीयस नाही. त्यांनी प्रत्येक प्रकारे माझी मदत करण्याचा प्रयत्न केला. बारावीमध्ये मी नापास झलो गणितात. खूप रडलो होतो. आई बाबा सुद्धा रडले होते. नंतर मी डिप्लोमा मध्ये प्रवेश घेतला. चांगल्या मित्रांची सांगत असल्यामुळे माझे मार्क्स सुधारले. डिप्लोमा मध्ये मी नववा होतो. आई बाबांची इच्छा होती कि आता इंजिनीयरींग मध्ये प्रवेश घ्यावा. पण माझ्या डोक्यात भलतेच काही होते. मला इंजिनीयरींग मध्ये आवड नव्हती आणि मला आर्ट्स मध्ये इंटरेस्ट होता. खूप वादा-वादी नंतर मी मुंबईला आलो.

एका कंपनीत नोकरी धरली आणि बी ए करायला सुरुवात केली. माझे एकटेपण, मनातली तगमग तशीच होती. माझ्या ऑफीसमध्ये मी एका मुलाच्या प्रेमात पडलो. तोही माझ्या प्रेमात होता. आम्हाला दोघांना एकत्र रहायला खूप आवडायचे. त्याच्या मोटारसायकलवर बसताना त्याला घट्ट पकडून बसायचो. त्यालाही ते आवडायचे पण तो कधी बोलू शकत .. मी मुलींबाद्दल बोललेले, त्याच्याकडे लक्ष दिलेले त्याला बिलकुल आवडायचे नाही. मी त्याला माझ्या भावना सांगितल्या पण तो म्हणाला तो गे नाही. तोपर्यंत तीन वर्ष झाली होती. मी त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला पण तो ह्या वयात त्या स्टेजमध्ये होता जे मी शाळेत होतो. त्याला त्याच्या लैन्गिकतेबद्दल अजून काहीच समजले नव्हते. मी पुष्कळ बोललो पण त्याला नाही समजले. मग मी स्वतःला सावरायला सुरुवात केली. तो पर्यंत माझे मुंबईमध्ये पुष्कळ समलिंगी मित्र झाले होते. मी मीटिंगला जायचो, फेस्टिवल्स ला जायचो. माझ्या सारखी हजारो लोक मला मुंबई मध्ये दिसली. माझा आत्मविश्वास वाढला. मला आठवते पहिल्या प्राईड मार्च मध्ये मी मुखवटा लावून गेलो होतो. पण थोड्या वेळातच तो मी काढून टाकला. त्यादिवशी मला जो अनुभव झाला तो अविस्मरणीय होता. मी जे आहे तसाच मी हजारो लोकांसमोर उभा होतो. कसली भीती नाही. फक्त अभिमान! प्राईड मार्च चा खरा अर्थ मी त्या दिवशी समजलो. माझ्या सारख्या असंख्य लोकासोबत मी चालत होतो.

असेच मी एकदा पुणे प्राईड ला गेलो होतो. डिसेंबर २०११ ची गोष्ट. प्राईडमध्ये मी सहभागी झालो आणि माझा फोटो फेसबुक वर कोणी तरी अपलोड केला. तो फोटो माझ्या आई आणि बहिणीने बघितला. किती टिपिकल आहे न माझे कमिंग आउट ? पण खरी मजा तर पुढे आहे! त्या सुमारास माझे आई बाबा मुंबई ला शिफ्ट झाले होते. आणि मी त्यांना माझ्या बद्दल सांगण्याचा विचार करत होतो पण काही उलगडत नव्हते. देव भले करो त्या अज्ञात इसमाचे ज्याने माझा फोटो अपलोड केला आणि माझे काम हलके केले. पण मी माझे भाषण सुद्धा तयार करीत होतो! पण त्या आधीच आई ने माझा फोटो बघितला आणि मला स्वतः यॆउन विचारले "भूषण तू गे आहेस का ?" माझी फाटली आणि मी तिकडून पळून गेलो. पण त्या नंतर तिचे माझ्या बहिणीशी बोलणे झाले होते. बहिणीने माझे समर्थन करत तिला सांगितले की गे हे एकदम नॉर्मल आहे आणि आपण भूषणचा स्वीकार करायला हवा. आईला खूप पटले नसले तरी ती काही बोलली नाही. पण ती म्हणाली कि बाबांना सांगू नकोस त्यांना खूप मोठा धक्का बसेल. मी म्हटले, ठीक आहे. मी एल जी बी टी चळवळीत जास्त सक्रिय होत गेलो. मला छान वाटायला लागले. आपल्या आयुष्याला खरा अर्थ मिळाला, खरे ध्येय मिळाले, खरी दिशा मिळाली. पोट-पाण्यासाठी आपण सगळेच काही न काही करतो पण आपण मनाच्या आनंदा साठी काय करतो हे महत्वाचे. जर अभिनय माझा श्वास असेल तर एल जी बी टी चळवळ ही माझी संगिनी आहे. दोघाशिवाय मी जगू शकत नाही.

आणि विचार करा ह्या दोघांचा सुंदर संगम जुळून आला तर त्या सारखे तर काहीच नाही ना? आणि असे झाले, एकदा नाही दोनदा . पहिले म्हणजे माझा लघु चित्रपट 'एकट्या भिंती' जी एक समलिंगी पिता पुत्राची कहाणी होती. आणि दुसरे म्हणजे माझे नाटक 'दुष्यंत-प्रिय'. आई बाबा बहिण आणि आत्या माझे नाटक बघायला आले होते. नाटक संपल्यावर जेव्हा मी प्रेक्षकांमध्ये मध्ये आई बाबांना बघितले तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुखी क्षण होता. समलिंगी विषयावरचे नाटक असले तरी आपल्या मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी आले म्हणून आणि मी माझ्या आयुष्यातली सर्वात आवडती गोष्ट म्हणजे अभिनय रंगभूमी वर करतोय आणि ते बघायला माझे आई बाबा आले - ह्या विचाराने आनंदाचे अश्रू वाहू लागले. तशाच भिजलेल्या डोळ्यांनी मी सगळ्यांना माझ्या आई बाबांची ओळख करून दिली. ते अश्रू पुसण्याची माझी इच्छाच नव्हती. नाटक बघून आई म्हणाली, "ठीक आहे दोन मुलांचे एकमेकांवर प्रेम होऊ शकते पण त्यांना ते जग जाहीर करायची काय गरज आहे?" मला ते ऐकून चांगले वाटले की आईला ह्यातले थोडेतरी पटले. नंतर पुष्कळदा आईशी याबाबत चर्चा व्हायची. कम्फर्टेबल नसली तरी मनाने समंजस होती. ती समजून घेण्याचा प्रयत्न करायची. पण तरी कुठेतरी ते स्वीकारलेले नाही. ती मला हे सुद्धा म्हणाली की तू एका लेस्बिअन मुलीशी लग्न कर. तिचे काळजी करणे आणि त्यावर पर्यायी उपाय शोधणे स्वाभाविकच होते. पण हा पर्याय नव्हता माझ्यासाठी. त्या मुली चेही आयुष्य बरबाद आणि माझेही.

११ डिसेंबर २०१३ हा दिवस भारतातील एल जी बी टी समुदायासाठी आणि वॆयक्तिकरित्या माझ्यासाठी सुद्धा दुःखी दिवस. समलिंगी संभोग .अ-प्राकृतिक असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हंटले. देशभर आक्रोश सुरु झाले. आई बाबंनी ही बातमी वाचली असावी. काहीतरी निमित्त झाले आणि आई बाबांना म्हणाली कि तुमचा मुलगा गे आहे. बाबांना बसला खूप मोठा धक्का. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. पहिले तर तोंडातून काही शब्दच फुटेना. मग ते खूप चिडले. मी शांत रहायचा प्रयत्न केला पण नाही जमले. इतक्या वर्षांचा आत दाबून ठेवलेला ज्वालामुखी फुटला. शब्दाने शब्द वाढला आणि बाबा बोलले की तू माझ्या साठी मेलास. दुसर्‍या दिवशी ते आणि आई पुण्याला निघून गेले. पण नंतर परिस्थिती चांगली होत गेली. आमच्या दोघांमधला अबोला संपला. माझ्या लैन्गिकतेबद्दल ते एक शब्दही बोलत नाहीत. पण त्या व्यतिरिक्त आमचे संबंध पूर्ववत झाले आहेत. स्वतःचे रक्त देऊन वाचवलेल्या मुलाला, रात्र रात्रभर मांडीवर घेऊन झोपवण्याचा प्रयत्न करूनही न झोपणार्‍या मुलाला, जरासे काही लागले तरी कळवळणारे ते दूर कसे ठेवू शकत होते? ह्यात माझ्या बहिणीचा आणि माझ्या जीजाजींचा देखील खंबीर सपोर्ट मला मिळाला.

मागच्या दोन वर्षांपासून मुबई प्राईड मार्च च्या योजना समितीमध्ये काम करण्याचे सौभाग्य मला मिळाले. आज मी खूप खुश आहे. जर तुम्हालाही खुश रहायचे असेल तर त्वरित लिहून घ्या ही खुश राहण्या ची पाककृती आणि पदार्थ तयार झाल्यावर कसा झाला हे मला नक्की कळवा. बाय बाय !

भूषण कुलकर्णी