खूळ

“हे कसलं ‘गे’चं खूळ लागलंय रे तुला?”

मला रविवारच्या रात्री तशाही अजिबात आवडायच्या नाहीत – नेहमी सोमवारसाठी असाइनमेंट लिहिता लिहिता सकळच्या तीन-चार वाजेपर्यंत जागं राहणं फार त्रासदायक वाटतं – आणि त्यावर बाबांनी व्हिस्कीचे एक-दोन पेग पीऊन हा प्रश्न मी बाजूला घाई-घाईत ती असाइनमेंट लिहत बसलो असताना विचारला. दोन शब्दांत म्हणायला गेलं तर, माझी फाटली.

खरं तर, ते तसं म्हणायला गेलं तर ‘गे’चं खूळ नव्हतं. खरं तर ते खूळच नाहीये. पण हे बाबांना सांगायचं कसं?

“मी त्यांना सपोर्ट करतो. त्यात काय एवढं?” खरंच बोल्लो मी. “हं, सपोर्ट असू दे, पण त्यांमध्ये इन्वॉल्व्ह नको होऊस.”

मी आतल्या-आत हसायला लागलो. “ह्यांना माझ्या ‘गे’ लोकांबरोबरच्या ‘इन्वॉल्व्हमेंट’ बद्दल सांगायला गेलो तर वाटच लागेल माझी.” तसं सपोर्ट आणि इन्वॉल्व्हमेंटने त्यांना नक्की सांगायचं काय होतं, ते मला कळालंच नाही. सर्वात वाईट जो अर्थ होऊ शकतो तो मी मानून घेतला.

आईला आणि बहिणीला माहीत आहे माझ्याबद्दल. पण त्या व्हिस्कीच्या खुल्या बाटलीची तीव्र विषय काढायला जी त्यांना मदत मिळत होती तशी मला काहीच मदत नव्हती. आई स्वयंपाकात, बहीण पुण्यात. असहाय्य होतो मी. आणि त्यावर ती असाइनमेंट, मेली.

“बाबा काहीही बोलतायत तुम्ही.” “अरे पण ते चुकीचं असतं. इट इझ अन्नॅचरल.” हे ऐकून माझं मन खचलं. नेहमी तर बाबा मी ‘लिबरल’ मानतो अशी मतं मांडायचे – बहिणीच्या सीकेपी बॉयफ्रेंड पासून निवडणूकीत आप ला पाठिंब्यापर्यंत. तसं मी काही गृहीत धरलं नव्हतं, पण आजूबाजूच्या माझ्या एल्जीबीटी मित्र-मैत्रिणींच्या ’अ‍ॅक्सेप्टिंग’ आई-वडिलांना पाहून मलासुद्धा असं वाटायचं की हो, आपले जन्यक सुद्धा असे असावेत. आईने तर आधीच काय ते सांगितलेलं - “मला वेळ लागेल हे मान्य करायला” म्हणून ढकलून टाकलं. वेळ दिला आणि देतच राहतोय. म्हणून आता हे नवीन काहीतरी नको हवं होतं. आई कुठनं तरी आली मध्येच आणि तिने हे बोलणं ऐकलं असावं. पण जेव्हा ती आली तेव्हा ती काही बोलली नाही आणि स्वयंपाकघरात गेली. तितक्यात जेवण वाढलं असण्याची सूचना आली, आणि मी हॉलमध्ये गेलो. बाबा आतच बसलेले. त्यांना माझ्यात चटकन बदल झाला असावा असं वाटलं आणि विषय बदलायला म्हाणून काहीतरी कंप्यूटरवर फनी व्हिडीओ दाखवायला मला बोलावलं. मला ते कळलं पण सर्वच इतकं भलतं वाटत होतं की मी हॉलमध्येच बसलो. “असू द्या, वेळ नाही आहे.” करून बाबांना एकटच ठेवलं.

त्यांच्या मनात सुद्धा असं वाटलं असेल का की आपल्या पोराला फार वाईट किंवा ऑकव्हर्ड् वाटलं असेल? मला ते फार जाणावलं की ते काहीतरी चुकलेलं बरं करण्याचा विचार करत होते, तो विषय बदलण्याचा प्रयत्न करून. मी घाबरलो होतो, पण हे कसलं कारण आपल्या वडिलांशी बोलणं न यावं ह्यासाठी?

हेवा वाटतो. मनातली एक फार वाईट अशी गोष्ट आहे ती. असलेल्या गोष्टी (प्रिव्हिलेज) न पाहता भरपूर काही हवं-हवसं वाटतं. मानून घेणारे आई-वडील, आपल्या हक्कांसाठी व सेक्शुअ‍ॅलिटीबाबत चर्चा करण्याची हिंमत, हवे तसे कपडे घालण्याची, हवं तसं वागण्याची हिंमत, सगळं हवं आहे. स्वतःला समजून आणि मानून घेण्याइतका समजूतदारपणा मिळाला आहे. पण तेवढाच पुरेसा आहे का? परवाच एका गे मित्राशी बोलणं झालं. त्याचं कोणत्यातरी एका क्लॉजेटेड् माणसाशी बोलणं झालेलं. तो माणूस फार शिक्षित असून सुद्धा त्याला वाटत होतं की त्याची सेक्शुअ‍ॅलिटी चुकीची व अनैसर्गिक आहे. त्याचाशी हे असं बोलणं झाल्यानंतर त्याने मला मेसेज केला होता. “आर वी जस्ट लकी?”

बिस्मथ

बिस्मथ म्हणजे आवर्त सारणीतला (पीरिऑडिक टेबल) त्र्याऐंशीवा घटक. ह्या लेखाच्या लेखकाला घाणेरडे श्लेष फार आवडतात. सारणीत बघायला गेलं तर बिस्मथचे चिह्न ‘Bi’ असे आहे. लेखक स्वतः बायसेक्शुअल (उर्फ ‘Bi’) आहे. घटनेच्या वेळी बिस्मथ इंजिनियरिंग शिकत असून आपल्या घरी बसला होता.