कोरड्याला तहानेचे वरदान

एखादी रणरणती दुपार असते. आपण एकटे चालत चाललो असतो. तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली.

पौगंडावस्थेचे माझे अनुभव सर्वसामान्य आहेत - बोर्डाच्या परीक्षा, कॉलेज, हॉस्टेल, मौजमजेचे बदलते प्रकार आणि जबाबदार्‍या. पण काहीतरी वेगळेही होते. मित्रामित्रांत अर्धी-अर्धी रात्र गप्पा चालायच्या. त्यांच्यात मी सामील होतोही, पण नव्हतोही. पुन्हापुन्हा खाजवून येणारा एक विषय होता - मुली! त्यांचा स्पर्श कधी झालेला नसायचा, पण मुलींच्या विचारानेच बेजार होणारी मनं, उत्तेजित होणारी शरीरे होती सगळ्यांची. पण मी? शरीर बेजार झाल्याचा अनुभव मलाही होता. रात्री ओला जागायचो बाकीच्यांसारखाच. पण मन मुलीमुळे बेजार झालेलं मी अनुभवलं नव्हतं. वयात येणार्‍या शरीराच्या रचनेचं, क्रियांचं पुस्तकी ज्ञान मला उत्तम होतं. तरी स्वानुभवात नसल्यामुळे मित्र मुलींबद्दलचं त्यांच्या मनातलं सांगायचे, ते नाटकी वाटायचं, वखवखलेलं वाटायचं. मित्रांच्या लक्षात आलं होतं - काही मला म्हणायचे, "बैरागी"; काही म्हणायचे, "ढोंगी". पण दोन्ही टोमणे खरे नव्हते - मला वैराग्यही नव्हतं, आणि माझ्या मनात भानगडीही नव्हत्या.

उथळ गप्पांचं सोडा, कालिदासासारखे अभिजात कवीसुद्धा शारिर वर्णनांत कमालीचे भावुक होतात. मला तीसुद्धा अलंकारिक अतिशयोक्ती वाटायची. कवी आपलेच विचार प्रभावी शब्दांत मांडतो आहे, असं वाटून मी कधी हुरळून जायचो नाही. थोडक्यात असं, की लैंगिकतेचं भावविश्वच मला अनोळखी होतं. आणि माझं दारिद्र्य इतकं, की त्याच्यावाचून माझं काही आडलं होतं, हेसुद्धा ठाऊक नव्हतं. म्हणजे मूर्त विचारांत ठाऊक नव्हतं. अमूर्त वावटळी स्वप्नांतच उधळायच्या, स्वप्नांतच थकायच्या.

वय वर्षे पंचवीस चालू असताना एकदा मी विद्यापीठाच्या ग्रंथालयात गेलो होतो. डोळ्यासमोर आलं म्हणून केवळ कुतूहल वाटून एक पुस्तक ओढून काढलं - "समलैंगिकता". मोठं अभ्यासपूर्ण पुस्तक होतं. तसं वस्तुनिष्ठ, कोरडं. पण आजवर वाचलेल्या सर्व पुस्तकांपेक्षा वेगळं. हे शारिरिक वर्णन करत नव्हतं, भावनांचं विश्लेषण करत होतं. पानं उलटता-उलटता मी शहारलो - यात माझं चरित्र लिहिलं आहे! पुस्तक लिहिलेलं होतं अमेरिकन वाचकांसाठी. त्यांची संस्कृती, धर्म, अनुभव वेगळे. त्या तपशिलांशी मला जोडणारं काय होतं? पण माझ्या आतड्याशी नातं जुळलं. झोपेतून खाडकन जागं व्हावं तसं त्या क्षणी मी म्हटलं - हा "मी" आहे. ती स्पष्ट ओळख होती. एकेक मुद्द्याला मुद्दा जोडून युक्तिवादाची गरज नव्हती, कारण तर्क दहा वर्षांच्या अमूर्त आठवणींत सिद्ध होते. या क्षणी पहिल्यांदा मूर्त विचारांत ते प्रकट झालं, इतकंच. पुस्तक निमित्त होतं - ते नसतं तर दुसर्‍या कुठल्या प्रकारे जाग यायचीच होती.

मला कारणं शोधावीशीच वाटली, तर "इतका उशीर कसा काय झाला?" याबद्दल. अगदी शाळेतही शरीराला उद्दीपित करणारं कोण? तर कोणीकोणी मुलगेच होते, हे स्पष्ट आठवलं. रात्री ओली करणारी, स्मृतीतून गायब केलेली स्वप्ने कोणाकोणत्यातरी मुलांबद्दलच होती, ते स्पष्ट आठवलं. या आठवणी पुरलेल्या होत्या, पण पुसलेल्या नव्हत्या. कोंब फुटायला इतकी वर्षे लागली, ते बी आधीपासून जमिनीत रुजलेलं होतं.

माझ्या मनातलं एक कुलूपबंद दालन त्या क्षणी उघडलं. त्या दालनाच्या खिडकीतून जगाकडे बघायचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. माझ्या मित्रांची मुलींबद्दलची वखवख त्यांच्या पौगंडावस्थेला अनुरूप, नैसर्गिक होती, असं मला पहिल्यांदा मनापासून जाणवलं. कारण त्याच्या समांतर ओढ त्या दालनात माझ्यापाशीही होती. या खुल्या दालनातून मला लख्ख दिसलं -कालिदासाचं काव्य सच्चं होतं, त्यात एक तसूभर अतिशयोक्ती नव्हती.

प्रेम, कामना, वासना, या सर्वांसाठी आपल्या हृदयात एक ठिकाण आहे, ते मला सापडलं. या सर्वांसाठी आपण किती व्याकूळ आहोत, हे लक्षात आलं. होय, खरं आहे की तहान जाणवण्यात तृप्ती नाही, पाणी पिण्यात आहे. पण आपल्या नकळत अशी ही गरज होती, आता मला ती कळली होती. मी प्रयत्न करेन, कधी काळी ती गरज पुरवेन, ही आशा मला त्या क्षणी मिळाली. आणि या आशेच्या तोलामोलाची दुसरी कुठली मिळकत नाही.

धनंजय वैद्य

धनंजय वैद्यचा हा खुलायचा प्रवास पाच-एक वर्षे चालला - आधी स्वतःशी, मग सहकार्‍यांशी, मग कुटुंबाशी. प्रत्येक लोढणे गळून पडले, तसे तो आयुष्याचे बाकीचे पैलू जगायला मोकळा होत गेला. त्याचे जोडीदारासोबत, ब्रायनसोबत, तो साधेसुधे घरगुती जीवनही जगू शकतो, आणि स्वत:ला मनापासून आपल्या व्यवसायात झोकूनही देऊ शकतो. बॉल्टिमोर, मेरीलँड, यूएस, येथे तो वैद्यकीय संशोधन करतो. तुम्हा सर्वांच्या आपआपल्या शोधयात्रेसाठी त्याच्या शुभेच्छा आहेत.