दादा आणि मी

( सत्य कथा)

१९९९ । डोंबिवली

मी शाळेतून घरी आलो. आम्ही दोघे टी. व्ही बघत बसलो होतो. त्याने मला रिमोट मागितला. मी म्हंटले, "नाही, मी नाही देणार!" दादा म्हणाला, "शी! कसा मुलीसारखा बोलतोस तू! काल सोसायटीमधली मुलेही म्हणत होती."


२००२ । डोंबिवली

"काय आहे हे?", एका इ-मेल कडे बोट दाखवत त्याने विचारले. मला दातखीळ बसली होती.

"ते … तो शाळेतला मित्र आहे." मी कसेबसे वाक्य पूर्ण केले.

"मी काय वेडा आहे? मला समजत नाही का?", दादा ओरडला.

मी शांत बसलो.

वाकड्या नजरेने मी ते मेल वाचले.

पहिले वाक्य होते, " डियर साजेश, आय वूड लाइक टू मीट यु " (प्रिय साजेश, मला तुला भेटायला आवडेल.)


२००३ । डोंबिवली

मी फोनवर बोलत असतानाच दादा आमच्या खोलीच्या आत आला. मी घाबरून फोन ठेवला.

"कोण होते?"

"श्रीहर्ष!", मी माझ्या शाळेतल्या एका (आणि एकुलत्या एक) मित्राचे नाव घेतले.

"मग ठेवलास का? बघू तुझा फोन?"

"नाही! मी का दाखवू", मी दरडावून विचारले.

"मग खोटे बोलायचे नाही!", दादा पुन्हा माझ्यावर बरसला.


२००७ । डोंबिवली

"का शेअर केले होतेस तू आमचे फोटो याहू चाट वर?", दादाने विचारले.

माझा इंटरनेट वर एक चांगला मित्र झाला होत. तो गे होता, माझ्याच सारखा.

आम्ही एकमेकांना आपापल्या परिवाराचे फोटो शेअर केले होते. मी काहीतरी वाईट करत आहे, असा विचारही माझ्या मनात आला नव्हता .


२००७-२०११

दादा आणि मी बोलणे जवळ जवळ टाकलेच होते. तो एका खोलीत असला तरी आम्ही बोलत नसू. मी इंटरनेटवर गे लोकांना भेटत होतो. माझा स्वतःला समजण्याचा प्रवास सुरु झाला होता.


२०११ । डोंबिवली

मी पवई मध्ये राहायचो. दादा आणि नेहाचा साखरपुडा. त्यांच्या मागे स्टेजवर उभा राहिलो होतो. दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि सभागृहात टाळ्या सुरु झाल्या. माझ्या डोळ्यात चटकन पाणी आले. "हा दिवस माझ्या नशिबी कधीच नाही", हा विचार मनात आला आणि मन खिन्न झाले. साखरपुडा अर्ध्यावर सोडला, रिक्षां पकडली आणि पवईला आलो. आईला कळले नाही की काय झाले - २०१२ पर्यन्त.

२०१२ जानेवारी । पुणे

पुण्यात मी आणि दादा-नेहा शेजारच्या इमारतीत राहायचो. माझ्या घरी कधी कधी मी माझ्या गे मित्रांना बोलावून जेवण बनवायचो. एकदा एका तशा "स्त्रैण" (फेमिनीन ) मित्राबरोबर सोसायटीमध्ये प्रवेश करत होतो. दादा समोर आला. मी थोडासा बावरलो. "हा मनोज", मी ओळख करून दिली. " अच्छा,हाय!" दादा म्हणाला आणि पुढे गेला.


२०१२ मे । पुणे

"मी गे आहे.", घाबरत घाबरत म्हणालो.

आई बाबा सहा दिवसांसाठी माझ्याकडे पुण्याला राहायला आले होते - आणि यंदा सांगायचेच ठरवले होते.

माझ्या घराच्या छोट्याशा हॉलमध्ये शांतता पसरली.

"आई, बोल ना ग काहीतरी." मी म्हणालो. आई कपाळावर हात ठेवून बसली होती. काही वर्षांपूर्वी काका गेला तेव्हा बसली होती, तशीच.

"बाबा। तुम्हीतरी काहीतरी बोला ना. " मी बाबांकडे आर्जव केला.

बाबाही कमालीचे बावरले होते. "अरे, म्हणजे, मला माहित होते की काही लोक असतात, पण आपल्याच घरात असेल असे वाटले नव्हते. ह्या सगळ्यातून असे वाटते की तू जर आधी सांगायला हवे होतेस, आपण काहीतरी मार्ग काढला असता", शब्द अपुरे पडल्यावर बाबांनी प्रश्न समोर बसलेल्या दादाकडे टोलवला, "तुला काय वाटते?"

"बाबा, आपण त्याला सपोर्ट करायला हवे. हे नैसर्गिक असते, आणि ह्यात काहीही चूक नाही.", दादा बाबांकडे पाहून ठामपणे म्हणाला. नेहा हलके हसत माझ्याकडे पाहत होती. तिने मला वोट्स-एप वर मेसेज केला, "प्लीज आता रडू बीडू नकोस!"


२०१२ जून । पुणे

'प्रयत्न' नावाचा एक गे-लेस्बिअन ग्रुप आहे. त्यांचा 'फेमिली मिट' चा कार्यक्रम होता. आपल्या जवळच्या व्यक्तीला गे म्हणून स्वीकारलेल्या नातेवाइकाञ्च्या मुलाखती घेतल्या जात असत. दोन मुलाखती झाल्या. तिसरे नाव पुकारले गेले. "आदित्य आणि त्याचा भाऊ आणि वाहिनी." आम्ही समोर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसलो आणि मुलाखत सुरु झाली.

दादा बोलू लागला. "मला २००२ च्या सुमारास आदित्य च्या इंटरनेट अकौंट मध्ये काही ईमेल्स दिसले होते. मग अर्जुन राम्पाल्ची चित्रे. काही महिन्यात माझे कुतूहल वाढत गेले. मी इंटरनेट हिस्टरी शोधली तर काही गे साईट्स आढळल्या. आधी धक्का बसला. समजले नाही. माझ्या तेव्हाच्या गर्लफ्रेंडशी, म्हणजे नेहाशी ह्या विषयांवर बोललो. तिलाही फारशी माहिती नव्हती. अनेक वर्ष संदर्भ येत गेले. मला समजत गेले - आणि मग कळले कि ह्यात गैर काहीही नाही. मग मात्र मी निश्चिंत झालो. मी आणि नेहा दोघेही आदित्य कधीतरी आम्हाला सांगेल ह्याची वाट पाहत बसलो."

"मी तुला लहानपणी अनेकवेळा चिडवले, ओरडलो. आय आम सोरी.", दादा माइक घट्ट पकडून म्हणाला. नेहा माझ्याकडे पाहून हलके हसत होती.

त्या रात्री मी, दादा आणि नेहाने पुण्याच्या 'पुरेपूर कोल्हापूर' मध्ये झणझणीत कोल्हापुरी थाळी खालली.

आदित्य जोशी