पिल्लू

आज मी सोफ्यावर शांत बसले होते. खूप दिवसांनी मनाला आणि शरीराला शांतता मिळाली होती. थोडा डोळा लागला तर डोळ्यासमोर एक चित्र तरळू लागले. हाताशी सोनू आणि कडेवर पिल्लू अशी मी कुठेतरी जात आहे.

जाग आली. बघते तर सोनू कधीच सोडून गेला आहे.पिल्लु तर कडेवरून उतरून कुठेतरी लांब गेला आहे. माझे हात रिकामेच आहेत. सोनू लग्न करून त्याच्या विश्वात रमला आहे, तर पिल्लुचे विश्वच वेगळे आहे.

तसे पिल्लू लहानपणापासून माझ्याबरोबरच असायचा. स्वयंपाक घरात रमायचा. मला त्याचा कधी त्रास झाला नाही. अभ्यासात खूपच हुशार आहे. लहानपणी वेगवेगळ्या वेशभूषा करण्याची आवड होती त्याला. एकदा तर त्याने माझी साडीच नेसली होती. झाशीची राणी समजत होता. मला त्याचे कधी वाईट वाटले नाही. सावरकर पण झाला होता. नाटकात पोपट, मूर्तिकार अश्या भिन्न भूमिका शाळेत गेदारिंगच्या वेळेस करत होता. शाळेत असताना त्याचे फार मित्र नव्हते. शाळेतले दिवस कसे पट्पट निघून गेले. पुढे कॉलेजमध्ये जात होता. मितरांपेक्षा मैत्रिणीच जास्त होत्या. मला नेहमी वाटायचे, कसे होईल याचे. ह्याच्या हुशारीला पाहून कोणी मुलगी भुलावणार तर नाही ना. पण तसे काहीच घडले नाही.

माझ्या साडीचा पदर धरून असलेला पिल्लू वेगळाच झाला होता. तो कधीकधी खूप रागवायचा, चिडचिड करायचा. काय करावे समजत नसे. पुढे तो इंजिनीयर झाला आणि एम टेकसाठी आय आय टी बॉम्बेमध्ये गेला. हॉस्टेल्वर राहायला गेला, तोही खूप रागावुन. असे का वागतो, ते कळलेच नाही.

पुढे तो जॉबसाठी गेला. माझ्यापासून लांब चालला होता. खूप दु:ख वाटत होते. पुढे नोकरी करत असताना तो स्वत:चे घर करून राहत होता. एकदा आम्ही चार दिवस राहायला गेलो.

एक दुपारी सोनू आणि त्याची बायको तिथे आले. नंतर कळले की पिल्लुनेच त्यांना बोलावले होते. आम्ही पाच जण एकत्र बसलो होतो. माझ्यासाठी खूप सुखाचा क्षण होता! माझे कुटुंब हे माझे विश्व आहे. बोलता बोलता पिल्लू आमच्या मनाची तयारी करत होता, हे नंतर कळले. (पुर्वी तो नेहमी म्हणायचा, "मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे!") काही दिवसांपूर्वी त्याने पानभर गोष्ट लिहून, माझ्या दृष्टीस पडेल अशी ठेवली होती. मी ती वाचली. तो नेहमीच असे काही लिहायचा. त्याच्या वेगवेगळ्या लिहिलेल्या गोष्टी वाचल्या होत्या. तसेच काहीतरी असेल असे वाटले होते. पण हे तसे नव्हते!

बोलता बोलता तो म्हणाला: "मी गे आहे!" ऐकता ऐकता मी बधीर होत गेले. इतर आयान्सारखी मीही पिल्लुसाठी चाकोरिबद्ध स्वप्न पाहिली होती. एक दोन दिवसात मी सावरले. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. पिल्लुचे बाबा मात्र लवकर मनाने तयार होईनात. हळूहळू तेसुद्धा तयार झाले आहेत.

आम्ही ठरवले की, सोप्पे आहे. १०० मुलांमध्ये दहा मुले वेगळी असतात. माझा पिल्लू त्या १० मध्ये आहे, एवढेच. माझ्या मुलाबद्दल मला अभिमान आहे. तो ताठ मानेने, संयमाने राहत आहे. आय आय टी मध्ये साथी ग्रुपमध्ये सहभागी आहे. माझा त्याला व त्याच्याबरोबर साथीमध्ये (व साथी कनेक्टमध्ये) असणार्‍यांना सलाम आणि शुभेच्छा.

सप्रेम, मंदा

मंदा

Manda is a mother whose son, Aditya came out to her in 2012. This is the first time she has written about her perspective.