मुंबई - चाकोरीबाह्य लैंगिकतेसाठी गौरवफेरी (उर्फ मुंबई एलजीबीटीक्यू प्राईड मार्च)

मुंबईतल्या 'एलजीबीटीक्यू प्राइड मार्च'मध्ये मी सामील होणार असल्याची जाहिरात मी आठवड्याभरापासून करत होते. त्यावर मिळालेल्या या काही प्रतिक्रिया:
  • "एलजीबीटी- क्या? क्या होता है ये?" आयटीमध्ये नोकरी करणारी सुशिक्षित तरुणी.
  • "म्हणजे कसली परेड? तू परेडला जाणारेस?" माझ्या आळशी स्वभावाशी जवळून परिचित असणारे कुटुंबीय.
  • "ते बीभत्स चाळे करतात ते लोक? पण इल्लीगल आहे ना ते आता?" म.म.व. सुशिक्षित शेजारी.
एक वेगळी प्रतिक्रिया म्हणजे - "अच्छा..." पाठोपाठ सूचक आणि अवघडलेलं मौन. "तू येणार का?" अशी विचारणा धडकून केल्यावर चेहर्‍यावर भीतियुक्त धक्का. तरीही चिकाटीनं विचारल्यावरचं उत्तर, "नाही, तशी हरकत नाही. तत्त्वतः मान्य आहे मला. पण मला 'तसं' समजलं कुणी तर? मला लग्न करायचंय यार..." यावर वाद घालता आला असता, पण प्रामाणिकपणाला दाद देऊन मी गप्प बसले. किमान "म्हणजे काय?" इथपासून तरी सुरुवात नव्हती. शिवाय प्रामाणिक भीती होती, ते ठीकच. बाकी 'वेळ नाही', 'आवडलं असतं', 'दुसरं काम आहे' अशा प्रतिक्रियाही मिळाल्या. वरच्या सगळ्या प्रतिक्रियांनी मला दिलेली लोकशिक्षणाची नामी संधी मी तत्काळ साधली हे सांगायला नकोच. आदित्यला भेटून मी आणि मस्त कलंदर त्याच्याबरोबर फेरीत सामील होणार होतो.

माहौल उत्सवी होता. गालांवर रंगीबेरंगी ट्याटू काढून देणारे लोक, कलम ३७७चा निषेध करणारी अनेक कल्पक पोस्टर्स, चित्रविचित्र वेशभूषेनं लक्ष वेधून घेणारे लोक, लोकांमध्ये सहज मिसळणार्‍या सेलिब्रिटीज, "हॅपी प्राइड" असं म्हणत प्रेमभरानं एकमेकांना मारल्या जाणार्‍या मिठ्या, गालाच्या आसपास केले जाणारे चुंबनसूचक आवाज (श्रेयाव्हेरः गौरी देशपांडे), चाकोरीबाह्य लैंगिकतेचं प्रतीक असणारे सप्तरंगी झेंडे. आजूबाजूला तुंबलेली रहदारी. अचंबित + कुतूहलमिश्रित नजरांनी या मेळाव्याकडे बघणारे बघ्ये. (हे बघ्ये पुढे फेरी पूर्ण होईस्तोवर अनेकवार भेटले.) आम्हीही उत्साहानं चेहरे रंगवून घेतले. ३७७ चा निषेध करणारे बिल्ले लावून घेतले. फोटो काढले.

जेमतेम १८ वर्षांचे असतीलसे वाटणारे दोन युवक लग्नाच्या पोशाखात आले होते. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम स्वीकारल्याची खुली पावती देणारी (आणि हातात करा धरलेली) एक प्रौढाही सोबत होती. मिरवणूकभर ते त्याच पोशाखात होते. त्यांच्यासोबत ढोलताशेही होते. अगदी लग्नाची वरात असल्यासारखं नाचणारी मंडळीही होती. "प्यार किया तो डरना क्या" असं विचारणार्‍या मधुबालाचं पोस्टर, पुरुषी आणि स्त्रैण वेशभूषांची (आता या विशेषणांबद्दल सजग असल्यामुळे त्यातली साचेबद्ध कुंपणं खटकताहेत. पण शब्द संदर्भानं समजून घ्यायचे असतात. त्यामुळे मी याहून 'पॉलिटिकली करेक्ट' संज्ञा शोधणार नाहीय.) अनोखी आणि कल्पक मिश्रणं. काही सोज्ज्वळ नऊवारी साड्या. तुर्रेबाज फेटे. काही लक्षवेधी काऊबॉईज. बरीच झेंड्या-बिल्ल्यासह पाठिंबा देणारी पण अगदी साध्या पोशाखातली मंडळी. मिरवणूक सुरू झाल्यावर आमचं लक्ष आजूबाजूच्या बघ्या मंडळींनी वेधून घेतलं.

रस्त्याच्या दुतर्फा तर ते थांबलेले होतेच. पण इमारतींच्या बाल्कन्यांतून आणि खिडक्यांतूनही फेरीकडे बघत होते. मुद्दाम शोधकपणे निरखून बघूनसुद्धा कुणाच्याही चेहर्‍यावर तिरस्कार वा घृणा मात्र दिसली नाही. हे फेरी सवयीची झाल्याचं द्योतक की केवळ मुंबईकरांची सहनशीलता? कुणास ठाऊक.
"यू आर गे -" कुणीतरी आरोळी दिली. "इट्स ओके!" उत्साही पुकारा.
"यू आर लेस्बियन - इट्स ओके!"
"यू आर हिजडा - इट्स ओके!"
"यू आर स्ट्रेट - इट्स ओके!" वर मात्र मनापासून हसू आलं!
"तारो मारो सेम छे, प्रेम छे प्रेम छे" ऐकली, आणि पाडगांवकरांची आठवण झाली. पाठोपाठ "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं" आलीच. आपली कविता इथवर पोचल्याचं कळल्यानंतर पाडगावकरांची भूमिका काय असेल, असं एक खवचट कुतूहलही वाटून गेलं.
एकूण गर्दीच्या मानानं मुली मात्र कमी होत्या. अगदी नव्हत्याच, असं नव्हे. पण कमी होत्या.
त्याबद्दल विचारणा केल्यावर कळलं, की एकूणच लोकांना रस्त्यावर उतरणं फार अवघड वाटतं. बरेच लोक काही ना काही कारणानं आपली लैंगिकता अशी जाहीर करायला बिचकतात. मुलींच्या बाबतीत तर ते अजूनच अवघड. आम्ही ज्या गटासोबत जात होतो, त्यात आमच्याखेरीज दुसरी कुणीही मुलगी नव्हती. पुढे बघ्यांमध्येही काही चाकोरीबाह्य लैंगिकतेचे क्लोजेटेड नसलेले लोक असल्याचं कळलं. त्यांनी खिडकीआड दडून नुसतं चोरटं अभिवादन केल्याबद्दल थोडी नाराजी + खिन्नता व्यक्त केली गेली, तितकीच.
अशा प्रकारच्या मिरवणुकींमध्ये आढळते, तशी बीभत्सता जवळ जवळ नव्हतीच. मिरवणुकीच्या दो बाजूंनी दोरी धरून मिरवणुकीला दिशा देणारे स्वयंसेवक होते, तसे कुणी कचरा टाकलाच, तर तो उचलून गोळा करणारेही काही स्वयंसेवक होते.

ज्यांची लैंगिकता कधीही दडपली गेलेली नाही अशा आमच्यासारख्या बिनधास्त मुलींना अशा प्रकारे रस्त्यावर उतरणं सोपं होतं-आहे. पण ज्यांना कुटुंबीयांचं, आप्तांचं, समाजाचं दडपण असेल - त्यांच्यासाठी हे किती अवघड असेल? आजूबाजूच्या बघ्या चेहर्‍यांमधे किती जण असतील या बाजूला येऊ इच्छिणारे? निदान या गटाबद्दल मोकळे - स्वीकारशील असणारे? पुन्हा एकदा - कुणास ठाऊक.

मग बससाठी समोरच थांबलो होतो. लोकांचा जल्लोष ओसरला होता, पण अजून पुरा थांबला नव्हता. गटागटांनी रेंगाळत गप्पा मारणं सुरूच होतं. तेवढ्यात बसस्टॉपवरच्या एका काकूंनी "हे काय चाललंय?" असं मकीला विचारलं. काय सांगावं हे तिला पटकन कळेना. त्यांचं वय-वर्ग पाहता त्यांना या गोष्टींबद्दल माहीत असण्याची सुतराम शक्यता वाटत नव्हती. मकीनं कशीबशी सुरुवात केली. "हा गे लोकांचा मोर्चा आहे. त्यांचं अस्तित्व मान्य करावं, त्यांना सगळ्यांनी समजून घ्यावं म्हणून..."

त्यावर फाटकन "हां, म्हणजे हे सगळे गे आहेत!" असं काकूंचं उत्तर. प्रश्नार्थक कमी आणि विधानाकडे झुकणारं जास्त. त्यांच्या चेहर्‍यावरचे भावही पालटले नाहीत. निर्विकारपणे समोरच्या बसमध्ये बसून काकू चालत्या झाल्या. आम्ही चकित!

मेघना, मस्त कलन्दर

मेघना 'ऐसी अक्षरे' नावाच्या मराठी वेब्साइटच्या कार्यात सक्रिय आहे. मस्त कलन्दर ही तिची मैत्रीण. 'पहावे मनाचे' नावाच्या वेबसाइटवर ही सध्या छान छान लिहीत असते. ह्या लेखात मेघना, एक स्ट्रेट स्त्री असूनही, मुंबई प्राइड मार्चला उपस्थित राहण्याच्या तिच्या अनुभवाबद्दल लिहिते. हा मूळ लेख 'ऐसी अक्षरे' साठी लिहिला गेला होता: http://www.aisiakshare.com/node/3716