ब्लॉक

इतके दिवस झाले... हातून काही लिखाण होतच नव्हतं. ‘रायटर्स ब्लॉक’ का काय म्हणतात, तसलं काहीतरी अनुभवत होतो. म्हणजे कल्पना करा की, एखाद्या मोठ्या खडकाने प्रचंड वेगाचा जलप्रप्पत अडवून ठेवला आहे. तो खडक फक्त निघता निघत नाहीये... अगदी असंच काहीतरी झालं होतं माझं.

मुंबईहून महाबळेश्वरला येण्याची बरीच कारणं होती. रोजच्या रूटीनमधून ब्रेक हवा होता, हे तर झालंच. मनसोक्त उंडारायचं होतं... पण त्याच्याबरोबर नवं काहीतरी लिहायला एकांत सहवा होता. तो मिळूनही इतक्या दिवसांत काही सुचलं नाही. उलट, एकटेपण खायला उठलं... नजर फिरवावी तिकडे नवविवाहित जोडपी आणि त्यांचा मुग्ध प्रणय. निसार्गापुढे मानव खुजा आहे, हे कळण्यासाठी एवढं उंचावर यायलाच हवं खरं तर... इथल्या पॉईंट्सवरून खाली डोकावून पाहिलं की आपल्या शून्य अस्तित्वाची पुन्हा नव्याने जाणीवा होते. पण संसाराची नांदी म्हणाव, असा मधुचंद्र साजरा करण्यासाठी आलेल्या दोन जीवांना या सगळ्या जाणिवांचा जणू विसर पडलेला... वेगवेगळ्या पोझेसमध्ये फोटो काढून घेण्यातच त्यांना आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं असावं. माझ्यासारख्या एकांड्या शिलेदाराला हे सगळं पाहून मत्सरावाचून दुसरं काय वाटणार रे?

असं असलं तरी, सहल काही अगदीच वाया गेली, असं म्हणता येणार नाही. ‘स्ट्रॉबेरी विथ क्रीम’ नावाचं अप्रतीम डेझर्ट दोन-तीन वेळा खाललं. उंच ग्लासच्या कडांनी स्ट्रॉबेरीचे सजवलेले काप, ग्लासात स्ट्रॉबेरी सिरप, स्ट्रॉबेरीचे तुकडे, आणखी बरंच काही आणी वरच्या थराला क्रीम. ‘सिझलिंग ब्राऊनी विथ आईस्क्रीम’ नंतर मला आवडलेलं हे दुसरं डेझर्ट... तू मागे शिवनेरीला गेला होतास, तेव्हा तिथले फार सुंदर फोटो पाठवले होतेस. तेव्हा तुला नेमकं काय वाटलं असेल, ते मला प्रतापगड पाहताना जाणवलं. तो गाईड शिवाजीराजांच्या काळचं जे वर्णन ऐकवत होता, ते पाहून छाती अभिमानाने भरून आली. जरा कुठे ट्रॅफिक जॅम झालं की संपलोच आपण सगळे... रोजचा प्रवास झेपेना आपल्याला... जिमला जायची टाळाटाळ… खरंच... कोणत्या निकषांवर आपण त्यांचे वंशज शोभतो रे? कसली पोलादी कणखर माणसं असतील रे त्या काळातली? त्या दगडाच्या पंधरावीस पायर्‍या चढतानाच मला कसली धाप लागली होती... कसला फुकाचा हिंदुत्वाचा अभिमान बाळगायचा रे आपण? ग्रेट ते लोक होते... आपण नाही... आपण फक्त दिवसभर पीसीसमोर बसून पोट वाढवायचं आणि दोन-तीन वर्षं झाली की कंपनी स्विच करून पॅकेज वाढवायचं...

अजूनही आठवतं मला... तू कितीकदा मला तुझ्या कंपनीच्या कँपसमधल्या फुलपाखरांबद्दल, वेगवेगळ्या रंगांच्या किड्यांबद्दर तरलतेने वर्णन करून सांगितलं होतंस. काल लिंगमाळा धबधबा पहायला गेलो होतो. चिटपाखरूही नव्हतं आजूबाजूला. अगदी टोकापर्तंत गेलो मग. एवढ्या उंचावरून खाली दरीत कोसळणारा तो धबधबा आणि उन्हामुळे त्यावर साकारलेले इंद्रधनुष्याचे रंग... आहाहा... किती विहंगम दृष्य!

अशा कितीक मनोरम दृष्यांची अंतःकरणात आणि मोबाईलच्या मेमरीत साठवण करून आज पुण्याला यायला निघालो काही मित्रांना भेटायला. परतीच्या वाटेवर गळ्यात हेडफोन्स अडकवले आणि 'कबिरा' ऐकू लागलो... माझ्या लाडक्या हीरोचं, रनबीर कपूरचं गाणं. अचानक काय झालं कळालंच नाही. तुझी खूप प्रकषनि आठवण येऊ लागली... प्रपाताला अडवून ठेवणारा तो खडक निखळून पडला... आणि शिवशंभूने जटेन धारण करण्यापूर्वी ज्या वेगाने गंगा पृथ्वीवर अवतरली असेल, तसाच माझ्या अश्रूंचा बांध फुटला...

तू पुण्यातच आहेस, पण मला भेटणार नाहीस... तू इथेही माझ्यासवे येऊ शकला असतास महाबळेश्वरला, पण ती शक्यता आपण दोघांनी उलथून पाडली स्वतःच्या इगोचे इमले शाबूत ठेवण्यासाठी. तू आला असतास, तर या प्रत्येक आठवणीला दोन अर्था लाभले असते... एक तुला कळलेला आणि एक मला कळलेला. डबला बेडच्या रूममध्ते माझा एकटेपणा तुझ्या शरीरात, तुझ्या गच्च मिठीत, तुझ्या मादक चुंबनात विरघळूनही गेला असता कदाचित... पण नकोच ते...

सात महिन्यांपूर्वी अगदी गंमती-गंमतीत चॅटिंगने आपल्या मैत्रीची सुरुवात झाली. तुझ्याबरोबर अगदी निर्लज्जपणे फ्लर्ट करून झालं... तुलाही मी आवडू लागलो होतो, हे स्पष्टच होतं. सुरुवातीला टाळाटाळ करणारा तू, हळूहळू तासन्तास माझ्याशी फोनवर गप्पा मारू लागला होतास. तुझ्या एक्स-बॉयफ्रेंड्च्या आठवणीने माझ्याशी बोलताना कितीकदा रडलासही. तुझ्या वरवर कठोर वाटणार्‍या स्वभावाआड दडलेला हळवा तू, मला हळूहळू उमगत गेलास... काय शेअर नाही केलं रे आपण? गुलजारांच्या कवितांपासून इम्तियाज अलीच्या चित्रपटांपर्यंत... संगीतापासून ऑफिस गॉसिपपर्यंत... हुकअप्सपासून सीरियस रिलेशनशिप्सपर्यंत... मुली पाहताना तुला येणार्‍या अनुभवांपासून फेसबुकवर मला भेटणारया एकोणीस-वीस वर्षांच्या पोरांच्या स्वप्निल अनुभवांपर्यंत... अगदी सगळंच खरं तर. किती खिदळलो... किती रडलो... एकमेकांना समजावत आधार दिला... पण मी सीरियस झालो ही तू पाऊल मागे घ्यायचास. अगदी सुरुवातीला तू म्हणाला होतास... दापोलीला जाऊया सहलीला... मीम्हटलं, मला घरी सांगावं लागेल सगळं: कुणाबरोबर जातोय, कुठे जातोय... साहजिकच तू चिडलास. म्हणालास "आपण कुठेही जायचं नाही एकत्र." का? नेमकी कसली भीती वाटत होती तुला?

मी कधीच गुंतलो होतो रे तुझ्यात पण तू अडकणार नाहीस, याची नेहमी काळजी घेतली असती मी. मात्र एकदा कोणत्यातरी फुटकळ कारणावरून आपला वाद झाला आणि तू म्हटलंस "थँक गॉड, आय अ‍ॅम नॉट इन रिलेशनशिप विथ समवन लाइक यू!" तुझ्या लेखी माझी काय किंमत आहे ते त्या एका क्षणात कळलं मला. मी तुला ब्लॉक केलं आणि आता तू केलं आहेस मला...

'जांभूळ आख्यान' आठवलं... कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं होतं, पण कर्णाला लक्षात राहिलं तो तिने केलेला अपमानच... "मी सूतपुत्राला वरणार नाही." हे तिचे जळजळीत शब्दं... आणि मग तिच्या वस्त्रहरणाच्या वेळी त्याने दुर्योधन आणि दुःशासनाला प्रोत्साहन दिलं. तुला मी व्हॉट्सॅप, फेसबुक अशा सर्व ठिकाणी ब्लॉक जरी केलं असलं तरी आज माझा सो कॉल्ड रायटर्स ब्लॉक तुझ्यामुळेच मोकळा झाला... अडलेली गाय मोकळी होते तसा...

एका रात्रीसाठी का होईना, तुझ्याशी संग करावा, असं अगदी मनापासून वाटत होतं पूर्वी... आता तेही नाही... पण असं एकमेकांना ब्लॉक करून मर्मबंधांचे ब्लॉकेजेस खरंच क्लिअर करता येतात का?

संदेश कुरतडकर

मी संदेश कुडतरकर. वय २९. आय.टी. कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत, पण लेखनाचे, चित्रपटांचे, नाटकांचे वेड. स्वतःला कुठलंही लेबल लावून न घेता नवनवीन माणसं जोडण्याचा मला छंद आहे. समान मानवी हक्कांवर आधारित समाज हे माझं स्वप्न आहे.